महात्मा गांधी आणि एक नास्तिक यांच्यामधील चर्चा
हा विषयच इतका रोचक वाटतो कि कुठल्याही तरुणाला आकर्षित केल्याशिवाय राहणार नाही. गोपराजु रामचंद्र दास (गोरा) यांनी गांधींसोबत घडवून आणलेल्या चर्चेच्या तसेच पत्रव्यवहाराच्या लेखांचा संग्रह आहे.
गोरा हे आंध्रप्रदेशात जाती निर्मूलनाच्या आणि अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात वाहून घेतलेले कार्यकर्ते होते. गांधींसोबतचा पहिला पत्रव्यवहार १९३० साली त्यांनी केला आणि सरळ आस्तिकतेबद्दल देवाबद्दलच प्रश्न उभा केला. त्यांना गांधींनी केवळ एका वाक्यात उत्तर दिले, "देव ही मानवी अनुभवा पलीकडील गोष्ट आहे.", त्यानंतर १० वर्ष गोरा हे एका कॉलेजात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते, १९४० साली त्यांचा नास्तिक विचारांमुळे त्यांना कॉलेजातून काढण्यात आले. त्यानंतर लागोलागच त्यांनी गावखेड्यांमध्ये जाऊन अस्पृश्यता निवारणाचे काम हाती घेतले. नास्तिक असल्याने अस्पृश्यता निवारणासाठी मदत होते असं त्यांचे मत बनलेले होते. एक वर्षाच्या कामानंतर ते गांधींना याबद्दल पत्र लिहितात. ज्यात माणसाला कोणत्याही जाती-धर्माचे लेबल न लावता माणूस म्हणून बघितल्यावर अस्पृश्यता निवारण करणे सोपे जाते याबद्दल थोडी मांडणी आहे. आणि शेवटी पत्रात मी चर्चेसाठी सेवाग्रामला येऊ शकतो असेही ते म्हणतात.
या पात्राला गांधींकडून आलेले उत्तर अगदी बुचकळ्यात टाकून वर उचलणारे आहे. गांधीच्या मते - देवाला नाकारणे म्हणजे स्वतःला नाकारणे होय. अस्पृश्यता निवारणाचे जे काम आपण करू शकतोय ते केवळ आपल्या अथक आणि प्रामाणिक प्रयत्नांचे फलित आहे.
एकंदर चर्चेतून हे दिसून येते कि गांधींची देव आणि धर्म या संदर्भातील संकल्पना, रूढ असलेल्या कल्पनांपेक्षा खूपच वेगळी होती. म्हणजे "एखाद्या जमातीला, धर्माला दुसऱ्या जमाती किंवा धर्मातील देव मान्य नसणे" हि एक साहजिक गोष्ट आहे, जी आजही मोठ्याप्रमाणावर रूढ आहे. त्यामुळेच आज विज्ञानवादी आणि मानवतावादी असणारे लोक मोठ्याप्रमाणावर देवाच्या या कल्पनेला मानत नाहीत. आणि त्यामुळेच जे लोक देवाला मानतात तरी त्यांच्या आयुष्यात अशा कोणत्याही जीवित देवाचं दर्शन दिसत नाही. (त्यासारख ते काम करत नाहीत.)
गांधींसाठी "देव हेच सत्य आहे.", त्याउपर हे वाक्य त्यांना अपूर्ण वाटते म्हणून पुढे जाऊन ते "सत्य हेच देव आहे.", असे देखील म्हणतात. आणि माणूस केवळ हात पाय असल्याने माणूस बनत नाही तर माणसाला माणूस बनण्यासाठी एक अशी वास्तू बनणे गरजेचे आहे ज्यात देव राहू शकेल. याचाच अर्थ मानवाने सत्याचे घर बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
पुढे गोरा यांची पहिली गांधी भेट होण्याचा योग जुळून येतो. ती भेट म्हणजे गांधीसोबत सायंकाळची १५ मिनिटे चालण्याची वेळ होय. त्यानंतर ३ दिवसांनी एक अर्धा तासाचा इंटरव्हिव तसेच काही महिन्यांनी सेवाग्राम मध्ये सहमित्र आणि सहपरिवार राहण्याचे निमंत्रण असा प्रवास करत ते गांधींच्या आस्तिक विचारसारणीची चाचपणी करतात तसेच नास्तिकते बद्दलचा आपला पक्ष स्पष्टतेने मांडतात.
गांधी त्या काळात देखील आपल्या मिनिट मिनिटांचे चोख नियोजन व अंमलबजावणी करत हे दिसून येते. इंटेलेक्च्युअल गप्पांना गांधींकडे स्थान नव्हते. केवळ समाजोपयोगी आणि सामाजिक लढ्यात बदलासाठी खऱ्या अर्थाने कामी येणाऱ्या चर्चांनाच ते वेधत असत.
गांधी नेहमीच एक प्रॅक्टिकल माणूस राहिलेले जाणवतात. आस्तिक असण्याने किंवा नास्तिक असण्याने सामाजिक बदल घडवू इच्छिणाऱ्या कार्यांवर फारसा फरक पडत नाही हे त्यांचे मत असल्याचे समजते. यावर फार चर्चा करत बसण्यापेक्षा, यापैकी कोणती गोष्ट समाजात खरंच चालत आहे आणि लागू पडत आहे, हे करून पाहण्यात गांधींचा जास्त भर होता.
असेच, प्रॅक्टिकल असणारे गांधी अजून एका घटनेवरून जाणवतात -
एकदा एक डॉक्टर आपण एक उपचार पद्धती विकसित केल्याचे सांगत असतो, १० मिनिटाच्या चर्चेत गांधी ती प्रणाली समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि डॉक्टरांना ३ दिवस आश्रमात राहून लोकांची सेवा करून ती खरंच तितकी उपयोगी प्रणाली आहे हे दाखविण्याची संधी मिळते.
असाच एक किस्सा एका इसमाचा आहे. त्याला गांधींसोबत बोलण्यासाठी १० मिनिटांचा वेळ दिलेला होता, आणि त्यातली ७ मिनिटे त्या इसमाने आपला प्रश्न मांडण्यासाठीच घेतली. त्याला गांधी म्हणाले - "जितका वेळ तुम्ही या प्रश्नाला मांडण्यासाठी घेतला आहे, त्यातून दिसून येते कि तुम्हाला हा प्रश्न पुरेसा समजलेला नाही.." - आणि त्याच्या अडचणींवर एक विलक्षण उपाय बापू देतात, तो म्हणजे, "जाऊन काम करत राहा! कार्यरत राहिल्याने आपल्या अडचणी दूर होतात."
गांधींच्या अहिंसेच्या तत्वाबद्दलचे एक विद्रुप स्वरूप आज प्रचलित आहे. तशाच एका स्वरूपाला तडा देणारी ही घटना -
गोरा हे आश्रमात असताना हॉस्पिटलच्या काही नर्सेस ना शिकवायची कामगिरी पार पाडत असतात. तेव्हा एका बेडकाला कापून त्याचे हृदय स्पंदन दाखविण्याची वेळ आलेली असते. त्या गोष्टीला नर्सेस पासून आश्रमातील सर्वच लोकांचा विरोध होतो. या गोष्टीला गांधींपर्यंत पोचविण्यात येते, पण गांधी अगदी अलगतपणे याला होकार देतात. - "हृदय स्पंदने जाणून घेण्याचा हा एकच मार्ग असेल तर बेडकाला कापा."
गांधी एक "राजकीय" सेन्स ऑफ ह्युमर असलेले व्यक्तित्व -
एकदा अर्ध्यातासाच्या इंटरव्हिव्ह साठी गोरा हे ठरलेल्या वेळेच्या ३ मिनिटे आधी गांधींकडे पोहचतात आणि गांधी त्यांना लवकर आल्याबद्दल विचारतात. गोरा - "पण माझ्या घड्याळात बरोबर ४ वाजले आहेत !", गांधी - "चला जाऊ द्या, आपल्या घड्याळी असहमत असू शकतात, पण आपण नको व्हायला !" - हे यंत्र आणि मानव यांतील एक मोठा फरक जाणवून देणारे भक्कम राजकारण होते.
काही काळापासून नास्तिक असलेल्या आणि समाजात खऱ्या अर्थाने अस्पृश्यता निवारणाचे काम करणाऱ्या व्यक्तीला गांधींसोबत आस्तिकता नास्तिकता या विषयाला धरून दीर्घकाळ चर्चा करण्याची वेळ केवळ गांधींच्या ३ महिन्यांच्या चाचपणी नंतरच येऊ शकली. १९४४ च्या आसपासच्या काळात गांधी आपला वेळ किती आणि कोणाला द्यायचा याबाबत अगदी स्पष्ट असल्याचे देखील समजते. गांधींना समजून येते कि गोरा हे काही अति उत्साही प्रकारचे नास्तिक नाहीत आणि त्यांनी समाजात खऱ्या अर्थाने नास्तिकतेला सोबत घेऊन अस्पृश्यता निवारणाचे कार्य केले आहे. पहाटे ४च्या दीर्घ वेळ चाललेल्या चर्चेतून गोरा देखील आपली बाजू चांगल्या प्रकारे मांडतात. त्यात गांधींना प्रामाणिकपणा तसेच एक आदर्श दिसून येतो. अनेकांतवादावर विश्वास असणारे गांधी म्हणतात - शक्य आहे कि तुम्ही बरोबर असाल आणि मी चूक, किंवा त्याउलट देखील. किंवा असे देखील होऊ शकते कि आपण दोघे चुकीचे निघून तिसराच बरोबर निघेल, हे वेळच ठरवेल. पण जोपर्यंत आपण आपल्या ध्येयाशी प्रामाणिक आहोत, तोपर्यंत जेव्हा जेव्हा आपण स्वतःला चुकीच्या गोष्टीत अडकलेले पाहू तेव्हा तेव्हा त्यातून बाहेर पडून योग्य त्या मार्गाने जाऊ. त्यापुढे गांधी गोरा यांना हवी ती मदत देण्याचे आश्वासित देखील करतात.
सोबत गांधींनी मांडलेले काही शब्द -
"चुका करणे काही चुकीचे नाहीए. कोणीही समजून आणि ठरवून चूक करत नाही. पण, एकदा चूक समजल्यानंतर ती न सुधारणे हि चुकीची गोष्ट आहे. जर तुम्ही चुका करायला घाबरत असाल तर तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकत नाही."
गोरा - "मी जे बोलतो तेच करतो - आणि हेच माझे नैतिक आचरण आहे. यात काहीही गुपित नाही ... "
गांधी - "होय, मी त्याला असं म्हणेन, 'गुपित असणं हेच पाप आहे.'"
गांधी हे नेहमीच एक व्यावहारिक माणूस राहिले आहेत, आपल्या विचारांना स्कॅन करून वैचारिकतेतुन मत बदलण्यापेक्षा व्यवहारातून अनुभव घेऊन आपली मते बनविली. आपल्या चुकीच्या निर्णयामुळे कोणत्याही कार्याचे - कल्पनेचे नुकसान होऊ नये, असे देखील ते मानत. व्यावहारिकता हीच गांधींसाठी कोणत्याही गोष्टीची चाचणी असे. वैचारिक आणि भावनाविवश गोष्टींना देखील त्यांनी व्यवहारिक उपयोगावरून ठरवल्या.
गांधींसाठी आस्तिकता आणि नास्तिकता हे आयुष्याकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन आहेत. गांधींनी स्वतः अस्तिकतेचा स्वीकार केला आणि त्याद्वारे ते प्रगती करत राहिले. नास्तिक विचार समाजाच्या प्रगतीसाठी कितपत उपयोगी पडेल याबाबत त्यांची शंका होती.
यातूनच आस्तिकता किंवा नास्तिकता केवळ बौद्धिक चर्चेचे कारण न बनता गांधींसाठी त्याचा समाज बदलासाठी लागणारा व्यावहारिक हातभार जास्त महत्वाचा होता हे दिसून येते.