दिवाळी विशेष: संत परंपरेचा वारसा - भारतीय संविधानाला!
काही दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांनी एका लेखातून 'नव्या राज्यघटने'ची गरज व्यक्त केली. आपल्या राज्यघटनेला 'वसाहतवादी वारसा' आहे, हे त्यांनी दिलेले कारण. सोप्या शब्दांत सांगायचे तर त्यांच्या मते, भारतीय संविधान विदेशी मूल्ये-विचार आणि इंग्रजांच्या विविध कायद्यांवर आधारित आहे.
या 'वारशाची' चाचपणी करताना क्लिष्ट वाद-विवादांमध्ये अडकण्यापेक्षा जर संविधानाच्या मुळ गाभ्याकडे पाहिले तर अधिक चांगले व बोलके चित्र स्पष्ट होऊ शकेल. हा गाभा किंवा संविधानाची मुलभूत चौकट म्हणजे संविधानाच्या प्रास्ताविकेत आलेले विचार - लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय.
भारतीय संविधानाला 'वसाहतवादी' म्हणण्याचा अर्थ हा की, ब्रिटीशपूर्व भारतात हे विचार अस्तित्वातच नव्हते आणि इंग्रजांकडून आपल्याला हे विचार मिळाले. वास्तव काय?
स्वातंत्र्य-समता
स्वातंत्र्य-समता-बंधुता ही मूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतून जन्माला आली असे अनेकांना वाटते. 1790 साली झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीच्याही 500 वर्षांपूर्वी भारतात अशा अनेक परंपरा अस्तित्वात होत्या ज्यांनी माणसाच्या स्वातंत्र्याचा आणि आपसांतील समतेचा आग्रह धरला. या परंपरा म्हणजे आपल्या भक्ती परंपरा- बौद्ध धम्म, जैन संप्रदाय, महानुभाव, लिंगायत आणि वारकरी संप्रदाय - यांसारख्या विविध भक्ती संप्रदायांनी रुढीवादी परंपरांविरोधात बंड करुन व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा विचार मांडला. प्रत्येक मनुष्य हा ईश्वराचा अंश आहे, त्यामुळे जन्मावरुन/जातीवरून होणारा भेदभाव चुकीचा आहे, असा विचार या संप्रदायांनी मांडला.
वारकरी संप्रदायाचे 'कळस' असलेले तुकोबा 350 वर्षांपूर्वी आपल्याला स्वातंत्र्याचा पाठ देताना सांगतात
सकळांसी येथे आहे अधिकार | कलियुगी उद्धारी हरिच्या नामे ||
ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य, शुद्र चांडाळाही अधिकार | बाळे नारीनर आदिकरोनी वेश्याही ||
पुढील अभंग तुकोबा भागवत धर्माचे सार सांगत समतेचा संदेश देतात
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ
कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वरपुजनाचे
आपण सर्व माणसं समान आहोत असे सांगताना संत कबीर म्हणतात,
अव्वल अल्लाह नूर उपाया, कुदरत के सब बंदे
एक नूर ते सब जग उपजा, कौन भले कौन मंदे
भक्ती संप्रदायातील संतांचे असे कितीतरी दाखले देता येतील. मग स्वातंत्र-समता ही मूल्ये विदेशी कशी?
बंधुता-धर्मनिरपेक्षता
पसायदानातील ओळ,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे
म्हणजे केवळ माणसांमध्येच नाही, तर संपूर्ण जीवसृष्टीत मैत्र व्हावे, अशी ज्ञानेश्वरांची इच्छा ही बंधुता नव्हे तर अजून काय आहे?
भक्ती संप्रदायांत फक्त एकाच नाही तर विविध धर्मांतील लोक सहभागी झाले होते. फक्त वारकरी संप्रदायाचेच उदाहरण घेतले तर यात आजवर 42 मुस्लिम संत होऊन गेलेत. त्यांपैकी श्रिगोंद्याचे संत शेख मुहम्मद, मंगळवेढ्याचे संत लतिफशहा यांचे नाव बहुदा सर्वांनीच ऐकलेले आहे. या सर्वांना विठ्ठलभक्ती करताना धर्म कधीही आड आला नाही.
संत नामदेवांनी अल्लाहच्या स्तुतीत लिहिलेला पुढील अभंग हा भक्ती परंपरेचे धर्मनिरपेक्ष स्वरुप सर्वांसमोर आणतो
करीमा रहिमा अल्लाह तूं गनी | हाजार हजूरी दरि पेसि तूं मनी ||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज धर्मनिरपेक्षतेचा सुंदर संदेश देताना म्हणतात,
सबके लिए खुला हैं, मन्दिर यह हमारा,
मतभेद को भुला हैं, मन्दिर यह हमार,
आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी,
देशी-विदेशीयों को, मन्दिर यह हमारा
आजही संत तुकोबांच्या पालखीचा पहिला विसावा हा हज़रत सय्यद अनगडशहा बाबांच्या दर्गावर होतो. ते तुकोबांचे शिष्य होते.
भारतात शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या दर्गांमध्ये जाणाऱ्या लोकांचे 'धर्म' पाहिले तर आपल्याकडे फार पूर्वीपासून ही बंधुतेची-एकतेची मिश्र परंपरा अस्तित्वात होती हे लक्षात येतं.
मध्ययुगीन भारतातील धर्मनिरपेक्षतेचे अजुन एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे शीख धर्माचे पवित्र ग्रंथ – श्री गुरु ग्रंथसाहेब. यात शीख धर्मगुरुंसोबतच शेख फरीद (बाबा फरीद) हे मुस्लिम सुफी संत आणि भक्ती परंपरेतील संत कबीर व संत रामानंद यांसारख्या 14 संतांच्या रचना आहेत. आपल्या महाराष्ट्रातील संत नामदेवांच्या 61 रचनांचाही यात समावेश आहे.
कृष्णावर सुंदर भजनं लिहिणारा रस खान आणि रामावर जीव ओवाळणारा कबीर ज्याच्या अनुयायांमध्ये हिंदू-मुस्लिम दोन्हींचा समावेश आहे - हे सर्व याच मातीत जन्माला आले आहेत.
एक आदर्श धर्मनिरपेक्ष शासन कसे असावे याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांची ही स्वदस्तुराची आज्ञा - 'ज्याचा जो धर्म त्याने तो करावा, यात कुणीही बखेडा उभा करु नये.’
अनेक अंगरक्षक मुस्लिम, तत्कालीन सर्वात प्रगत हत्यार – तोफखान्याच्या प्रमुख मुस्लिम, आरमाराचा प्रमुख मुस्लिम, वकील मुस्लिम, अठरापगड जातींचे सरदार व सैनिक - यातून आपल्याला हेच दिसते की स्वराज्याचे शासन चालवत असताना शिवाजी महाराजांनी कधीही एका धर्माला झुकते माप व दुसऱ्या धर्माचा द्वेष - असे केले नाही. त्यांसाठी धर्म ही एक खाजगी बाब होती. तरीही बंधुता-धर्मनिरपेक्षतेला आपण 'विदेशी' म्हणणार?
अभिव्यक्ती स्वातंत्र्य
ज्या सर्व महापुरुषांचा आज आपण जयजयकार करतो, त्यासर्वांनी समाजाच्या कर्मठ रुढींविरोधात पुकारलेले बंड ही त्यांची अभिव्यक्ती नव्हे तर दुसरे काय होते? आपला इतिहास पुरुषच नाही तर स्त्रीसंत आणि स्त्री समाजसुधारकांच्या अभिव्यक्तीच्या आविष्काराने सजलेला आहे.
800 वर्षांपूर्वी जनाबाई गर्जते
डोईचा पदर आला खांद्यावरी ।भरल्या बाजारी जाईन मी ॥१॥
हाती घेईन टाळ खांद्यावरी वीणा ।आता मज मना कोण करी ॥२॥
मध्ययुगीन भारतात अस्पृश्य समाजल्या जाणाऱ्या समाजात जन्माला आलेल्या संत चोखामेळ्याची समाजातील विषमतेवर बोट ठेवणारी अभिव्यक्ती पहा,
एकासी आसन, एकासी वसन। एक तेची नग्न फिरताती ।।
एकासी कदान्न एकासी मिष्ठान्न । एका न मिळे कोदान मागतांची ॥
एकासी वैभव राजाची पदवी | एका गावों गावीं भीक मागे ||
आपल्या आजुबाजूची परिस्थिती कितीही विपरीत असली तरिही बहुमतालाही न जुमानता आपले सत्य ठामपणे मांडायला पाहिजे, असे तुकोबा सांगतात,
सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता |
हे सर्व अभंग आजही समर्पक नाहीत का?
सनातन्यांचे शेण-गोटे झेलूनही त्यांविरोधात खंबीरपणे उभे राहिलेले सावित्रीबाई-फातिमाबी-जोतिबा - आजही आपल्यातल्या अभिव्यक्तीला प्रेरणा देत नाहीत का?
समाजवाद
यशोदेचा कृष्ण हा पहिला समाजवादी होता, असे म्हणणे अतिषयोक्ती होणार नाही. सुखवस्तु कुटूंबात राहात असलेल्या कृष्णाने गोकुळातील बालगुराख्यांना सोबत घेतले. आपले सवंगडी उन्हातान्हात गाई राखतात, दूध काढतात, त्याचे तूप-लोणी बनवतात; पण यापैकी काहीही त्या गरीब बिचाऱ्यांना मिळत नाही. याची भगवंताला चीड आली आणि त्यांनी गोपाळांना त्यांच्या हक्काचे दूध, लोणी, दही द्यायला सुरुवात केली. 'राबणाऱ्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळालेच पाहिजे' हा समाजवादी विचार आचरणात आणला.
समाजवादात प्रत्येकाची प्रत्येक गरज (चैन नाही) पूर्ण होईल, असे निहीत असते. ज्ञानेश्वर माऊली पसायदानात विश्वात्मक देवतेला दुसरं काय मागत आहेत!
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
‘मी समाजवादी आहे' - 1896 सालचे विवेकानंदांचे हे उद्गार आहेत. अचानक लहर आली म्हणून नव्हे तर अनेक वर्षांच्या सखोल चिंतनानंतर त्यांनी हा निष्कर्ष काढला की, भारतातील गरीबी आणि मागासलेपणावर उपाय समाजवादामध्येच आहे. विवेदानंदांचे स्वप्न होते की समाजवाद फक्त भारतातच नाही तर सर्व जगभर येईल आणि प्रत्येक देशातील कामगार – ज्यांना विवेकानंद शूद्र म्हणतात – समाजवादी आंदोलन करुन नवीन समाज निर्माण करतील.
स्त्रीस्वातंत्र्य आणि स्त्री-पुरुष समानता
'न स्त्री स्वातंत्र्यमर्हति' - हा मनुवादी विचार येथील भक्ती संप्रदायाने सपशेल नाकारला. म्हणूनच समाजात दुय्यम स्थान असलेल्या महिलांना येथे संतपण मिळाले. कुणी मोलकरीण होती, कुणी वेश्येची मुलगी तर कुणी महारीण. त्यांचे सामाजिक स्थान त्यांच्या कर्तुत्वाच्या कधीच आड आले नाही.

म्हणूनच जनाबाई म्हणजे,
स्त्रीजन्म म्हणोनि न व्हावे उदास, साधुसंत ऐसे केले जनी
मुक्ताबाईच्या पुढील अभंगातील प्रेरणा पहा,
मुंगी उडाली आकाशी | तिने गिळीले सुर्याशी ||
पुरुषसत्ताक समाजाच्या विचारांवर प्रहार करत संत विठाबाई आपल्या नवऱ्याला म्हणते
तुझी सत्ता आहे देहावरी समज, माझेवरी तुझी किंचित नाही ||
यातून तत्कालीन स्त्रीयांचा 'मुक्तीचा आत्मस्वर' आपल्याला ऐकू येतो. म्हणजे स्त्रीस्वातंत्र्य ही विदेशी संकल्पना नसून याच मातीतला एक विचार आहे.
अजुन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे, परमार्थासाठी प्रपंच सोडून अरण्यवास पत्करण्याची किंवा व्यावहारिक कर्मांना फाटा देऊन संन्यास घेण्याची गरज नाही असे वारकरी संतांनी वारंवार सांगितले. ज्ञानेश्वरीतील ही ओवी पहा,
आता गृहादीक आवघें । तें कांहींच नलगे त्यजावें
प्रपंच करत ईश्वरभक्ती करणे हा विचार स्त्रीयांना व्यर्ज व त्याज्य म्हणणाऱ्या सनातनी पुरुषसत्ताक व्यवस्थेला एक चपराक होती.
फक्त आध्यात्मिक आघाडीवरच नाही तर ब्रिटीशांविरोधात रणांगणात उतरलेल्या राणी लक्ष्मीबाई, झलकारीबाई, दक्षीण भारतात ब्रिटीशांचे दारुगोळ्याचे आगार नष्ट करण्यासाठी स्वत:ला आग लावणारी कुथीली, नंतरच्या काळातील असंख्य स्वातंत्र्यसेनानी, आजाद हिंद फौजेतील महिला सैनिक - याही येथल्याच.
जर येथील मातीत स्त्री-पुरुष समानतेचा विचार नसता तर ब्रिटीशपूर्व काळात हा स्त्रीस्वातंत्र्याचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळाला असता का?
सामाजिक न्याय
शेकडो वर्षे मागास जिवन जगलेल्यांना सन्मानाने आणि माणुस म्हणून जगता यावं, यासाठी केलेल्या प्रयत्नांचा इतिहासही शेकडो वर्ष जुना आहे.
शिवाजी महाराजांची स्वराज्याची संपूर्ण कल्पनाच ही सामाजिक न्यायाच्या संकल्पनेवर आधारित होती. उपेक्षित रामोश्यांना हेरगिरीचे खाते, महार किल्लेदार, मदारी 'मेहतर' गादीचा सेवक, दुष्काळात शेतसारा माफी, गरीब शेतकऱ्यांना औत (नांगर), बी-बीयाणे, गायी पुरवणे, ‘शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका' अशा अनेक आज्ञा - हे तत्कालीन सामाजिक न्यायच होते. शिवाजी महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या धोरणांमुळेच सर्वसामान्य रयत त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार झाली.
स्वराज्यात लुटमार, दरोडा यांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले होते. कारण - राजांचे सामाजिक न्याय.
'लाखो मेले तरी चालतील तरी लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे.’ रयतेच्या या भुमिकेचे कारण - राजांचे सामाजिक न्याय.
शिवाजी महाराजांच्या सामाजिक न्यायाचा वारसा पुढे नेला तो राजर्षी शाहू महाराजांनी. त्यांनी दलित-बहुजनांच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले व वसतिगृहांची चळवळ उभारली. 1902 साली मागासवर्गियांसाठी 50% आरक्षणाचा कायदा केला. इंग्रजांनी ‘गुन्हेगार' अशा शिक्का लावलेल्या फासेपारधी जमातींतून अंगरक्षक व पहारेकरी नेमले. तत्कालीन महार समाजातील लोकांचे 'महारकीचे वतन' खालसा करुन त्यांच्या जमिनी त्यांच्या नावे करुन दिल्या.
याच शाहू महाराजांकडून मदत घेऊन शिक्षण पूर्ण केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांची सामाजिक न्यायाची मशाल पुढे तेवत ठेवली. वॉईसरॉय काऊंसील मध्ये काम करताना ब्रिटीशांचा विरोध पत्करत त्यांनी कामगारांच्या फायद्याचे अनेक निर्णय घेतले. खाणकामगारांच्या रेशनची सोय, त्यांसाठी कामगार फंडाची तरतूद, महिला कामगारांना प्रसुति रजा, कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्रिस्तरीय समिती; 'राज्य व अल्पसंख्यांक' या पुस्तकात मोठे उद्योग, बँक-वीम्याचे राष्ट्रीयीकरण, जमीनीचे फेरवाटप, सर्वांसाठी मोफत शिक्षण व आरोग्यसेवा - यांचा आग्रह, यातून आंबेडकरांची सामाजिक न्यायाबद्दलची मजबूत बांधिलकी दिसून येते.
महात्मा गांधींची सामाजिक न्यायाची संकल्पना बरीच उपेक्षित राहिली. सुरुवातीला स्वत:ला सनातनी हिंदू म्हणवणाऱ्या म. गांधींनी नंतरच्या काळात दलितांच्या मंदीरप्रवेशासाठी भारतात अनेक ठिकाणी मंदीर सत्याग्रह केले. जोडप्यांपैकी एकजण दलित असेल अशाच लग्नाला मी जाईन, अशी कडक भुमिका घेतली व ती आयुष्यभर पाळली. भारतीय संविधानाचा पाया हा सामाजिक न्यायाचाच असावा त्यामुळे संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर असलेच पाहिजेत, असा त्यांनी आग्रह धरला. त्यामुळे देशाच्या फाळणीमुळे संविधान सभेची सदस्यता गमावलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसच्या जागेवरुन निवडून आणून थेट सर्वात महत्वाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष बनवले गेले. संविधान सभेत जाऊन बाबासाहेब पुढे जे महान कार्य करु शकले त्यामागे मोहनदास करमचंद गांधी नावाच्या माणसाची 'सामाजिक न्याया'शी असलेली अतूट बांधिलकी आहे, हे आपल्याला विसरुन चालणार नाही.
स्वामी विवेकानंद तर दलितांच्या शिक्षणाचे खंदे समर्थक होते. त्यांची सामाजिक न्यायाची कल्पना आजही अनेक लोकांना पचनी पडणार नाही. ते म्हणतात, 'ब्राह्मणापेक्षा चांडाळांना शिक्षणाची जास्त आवश्यकता आहे. ब्राह्मण मुलाला जर एक शिक्षक लागत असेल तर चांडाळ मुलांना दहा शिक्षक हवे.’ खालच्या म्हणवलेल्या जातीतील लोकांना प्रगती करणे शक्य व्हावे ह्यासाठी त्यांनी ब्राह्मणांना आपले विशेष अधिकार सोडण्याचे आवाहन केले. विवेकानंद केवळ येथेच थांबत नाहीत, ते पुढे जाऊन कनिष्ठ जातींसाठी 100% आरक्षणाची मागणी करतात.
मध्ययुगीन काळापासून ते आधुनिक भारतापर्यंत अनेक महापुरुषांनी सामाजिक न्यायाची मशाल तेवत ठेवलेली असताना ही संकल्पना ब्रिटीशांकडून प्रसवली गेली, असे म्हणायला काही वाव उरतो का?
लोकशाही
लोकशाही ही तुलनेने नक्कीच आधुनिक संकल्पना आहे. पण याचीही पाळेमुळे इंग्लंडमध्ये नसून ती भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आहेत. भारतीय स्वातंत्र्यलढा हा जगातील आजवरचे सर्वात मोठे जनआंदोलन आहे. यात 20% जनतेचा सक्रिय सहभाग होता. या लढ्यात गरीब, श्रीमंत, महिला, दलित, सवर्ण, आदिवासी असे समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोक सहभागी झाले होते. हा देश आपला आहे व आपणच आपल्या भाग्याचे भाग्यविधाते आहोत- ही त्यामागील 'लोकशाही प्रेरणा' होती.
इंग्लंडमध्ये आजही राजाचे स्थान अबाधित आहे. इंग्लंडचा राजा तेथील आणि त्यासोबतच जगातील इंग्लंडच्या प्रदेशांचा (ओव्हरसीज ब्रिटीश टेरिटोरीज) घटनासिद्ध अध्यक्ष आहे. तेथील पंतप्रधानाला आजही राजासमोर हजेरी लावावी लागते. देशाच्या धोरणनिर्मीतीमध्ये राजा हस्तक्षेप करु शकतो. तेथील सर्वसामान्य लोकांचा करांच्या पैशांतून आजही राजपरिवाराची चंगळ चालते.
आपण राजेशाही कायदेशीररित्या रद्द केली आणि लोकांनाच देशाचे 'राजे' बनवले. म्हणूनच संविधानाचे सुरुवातीचे तीन अद्भुत शब्द आहेत - 'आम्ही भारताचे लोक'...
या दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताची तुलनाही बरेच काही सांगून जाते.
इंग्लंडचे राष्ट्रगीत आहे – 'गॉड सेव्ह द किंग’. म्हणजे देवा राजाची रक्षा कर. लोकशाही राष्ट्रात राजेशाही टिकून राहावी यासाठी तिथले लोक रोज प्रार्थना करतात, यापेक्षा मोठे लोकशाहीचे दुर्दैव काय असु शकेल?
याच्या अगदी विपरित आहे आपल्या भारताचे राष्ट्रगीत - जन गण मन अधिनायक... म्हणजे इथली जनताच या देशाची अधिनायक आहे आणि असेल.
कोणत्या देशाने कोणत्या देशाला 'लोकशाही' शिकवावी?
अशाप्रकारे लोकशाही, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य-समता-बंधुता, समाजवाद यांसारखी मूल्ये ही इथल्याच मातीत फार पूर्वीपासून रुजलेली होती. आपल्या महान स्वातंत्र्यसैनिकांची नाळ याच मातीशी जोडली असल्याने पुढे त्यांच्यामार्फत हे विचार भारतीय संविधानातही आले.
त्यामुळे भारतीय संविधानाला वारसा नक्कीच आहे, पण वसाहतवादाचा नाही.. तर समतावादाचा!
तरीही भारतीय संविधानाला विरोध का?
प्रामुख्याने हा विरोध करतात ते हिंदुत्ववादी विचारधारेचे लोक व संघटना. त्यांचा हा विरोध संविधान निर्मितीपासून सुरु आहे. 1947 साली स्वतंत्र भारत हा लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, समता व बंधुता या तत्वांवर उभा राहाणे या शक्तींना मान्य नव्हते. म्हणून त्यांनी सुरुवातीपासूनच संविधानाला विरोध केला.
संविधानाला सरळ विरोध करता येत नाही, त्यामुळे त्याला 'वसाहतवादी' आणि विदेशी मूल्यांवर आधारीत आहे असे म्हणून आपण 'राष्ट्रवादी' आहोत असे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.
संविधानाला 'वसाहतवादी' म्हणनाऱ्यांचा इतिहास काय?
त्यांनी गांधी-नेहरू प्रणीत स्वातंत्र्यलढ्याला नेहमीच विरोध केला. धार्मिक द्वेष पसरवून ब्रिटीशांना मदत केली. इतकेच नाही तर 1942 साली काँग्रेसने ब्रिटीशांवर बहिष्कार टाकून राजीमाने दिल्यानंतर बंगाल व वायव्य सरहद्द प्रांतांत हिंदू महासभेने मुस्लिम लीगसोबत हातमिळवणी करुन सरकार स्थापन करुन ब्रिटीशांना सहकार्य केले.
याच लोकांनी 1942 सालच्या 'भारत छोडो' आंदोलनावर बहिष्कार टाकून भारतीयांना ब्रिटीश फौजांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. शामा प्रसाद मुखर्जीनी बंगालमध्ये 'भारत छोडो' आंदोलन जोर धरु नये यासाठी ब्रिटीशांना पत्र लिहून सजग केले.
अशाप्रकारे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला विरोध करणाऱ्यांना समतावादी-लोकशाही-धर्मनिरपेक्ष संविधान मान्य होणे शक्यच नव्हते. आज स्वत:ला देशभक्त म्हणवणाऱ्यांनी त्याकाळी देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे आणि आत्मसन्मानाचे प्रतिक – तिरंग्यालाही विरोध केला आणि स्वातंत्र्यानंतर तब्बल 52 वर्षे तो फडकवला नाही.
मनुस्मृती आणि 'मनी'स्मृतीचे वारसदार
संविधानाला नावे ठेवणाऱ्यांचा 'वारसा' खरंतर मनुस्मृतीचा आहे. हिंदुत्ववादी विचारधारेच्या 'ऑर्गनायजर' या मुखपत्रात 'मनुस्मृती आधारीत संविधानाची गरज' यावर आलेले लेख हे सर्वश्रूत आहे.
ब्रिटीशांचीच 'फोडा व राज्य करा' नीती राबवून आज देश चालवणारे राज्यकर्ते हेच खऱ्या अर्थाने ब्रिटीशांचे 'वसाहतवादी वारसदार' आहेत.
भाजपच्या आर्थिक धोरणांमुळे एका बाजुला मागच्या 45 वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, लघू-मध्यम व्यापाऱ्यांची दुर्दशा, कुपोषण तर दुसरीकडे सरकारच्या 5% श्रीमंत 'मित्रांकडे' देशाची 50% संपत्ती. मुठभर भांडवलदारांच्या नफ्यासाठी देश चालवून देशात नग्न आर्थिक विषमता तयार करणारे सरकार हे मनुस्मृतीसोबतच 'मनी'स्मृतीचेही वारसदार आहेत.
त्यातच आज प्रत्येक सार्वजनिक सेवेचे खाजगीकरण आणि रोजगारांचे कंत्राटीकरण करुन देश चालवणाऱ्यांना सामाजिक न्याय व समाजवादाचा आग्रह धरणारे संविधान 'अडसर' वाटू नये यात आश्चर्य काय! त्यातच 'आर्थिक' सल्लागाराकडून येणारे हे वक्तव्य केवळ एक योगायोग नव्हे!
निवड आपली
आपल्याला स्वातंत्र्य-समता-बंधुता या त्रिपदीवर आधारीत भारत हवाय की मनुस्मृती व 'मनी'स्मृतीच्या दुपायीवर आधारीत 'नवा' भारत हवाय, हा निर्णय येत्या काळात आपल्याला घ्यावाच लागेल व त्यासाठी कृतीशील व्हावे लागेल.
जय हिंद! भारत माता की जय!
- तुषार रईसा हंसदास
7709508954
[email protected]