सवालाचा जबाब दे रं
savalacha jababa de ram savalacha jababa de ram savAlAchA jabAba de raM | सवालाचा जबाब दे रं
ही आग चहु बाजूनं हो लागली संसारा
सवालाचा जबाब दे रं देशाच्या सरकारा
दुधाच्या रंगाची आज बुजली वळख
परागंदा झालं हो, खोबरं खारीक
गुळाच्या चहावर बाळाचा गुजारा, सवालाचा...
सोन्याची किंमत आली, गोडया रं तेलाला
खोबरेलचा थेंब, आम्हा मिळंना डोईला
घासलेटावाचून अंधार सोईरा, सवालाचा...
उन्हात भाजतो, आम्ही पावसात भिजतो
थंडीचा कडाका, उघडयानं सोशितो
आम्हालाच अजून का मिळंना निवारा, सवालाचा...
रात्रंदिस राबून, आम्ही झोपतो उपाशी
आईतखाऊ हा तिकडं, जेवतो तुपाशी
चोराला मलिदा, अन् धन्याला धतुरा, सवालाचा...
मोठयाच्या गुराला, चाराया गायरानं
जंगलाच्यासाठी आहे, राखली जमीन
माणसाला जगण्यासाठी नाही का आसरा, सवालाचा..
स्वराज्याच्यासाठी, आम्ही भरिले तुरुंग
गोऱ्याच्या गादीला, आम्ही लाविला सुरुंग
हे पोळ पोसाया का आम्ही पुजीला देव्हारा, सवालाचा...
मजूरीत वाढ आणि बेकारांना काम
कसण्यासाठी आम्ही, थोडी मागतो जमीन
तुरुंग काठया गोळ्यांचा का मिळतो इशारा, सवालाचा...
आता आम्ही राहू, उभे पायावर
जाती धर्म भेद, सोडू वाऱ्यावर
राबणाऱ्या गोताचा करीत पुकारा, सवालाचा...
घेतो आज आण आम्ही, जिवानिशी लढू
भांडवलशाहीला, आम्ही मसणात गाडू
आमुच्या राज्याचा हो वाजवू नगारा, सवालाचा...
- भास्कर जाधव