एकजुटीचा नेता
ekajuticha neta ekajuticha neta ekajuTIchA netA | एकजुटीचा नेता
एकजुटीचा नेता, झाला कामगार तैय्यार
बदलाया रे दुनिया सारी दुमदुमली ललकार
सदा लढे मरणाशी ज्याला नच ठावे शांती
रक्त आटवून जगास नटवून जगण्याची भ्रांती
उठला खवळून झुंज झुंजण्याला
वादळ उठवून बांध फोडण्याला
निश्चय झाला, पाय उचलला, चालू लागला करण्या नवा प्रहार
मध्ययुगाची जीर्ण हाडे ही निरंकुश राजे
देशी धनवंतांचे साथी परकी साम्राज्ये
फाड़ुनिया बुरखा उघड जगा दावू
जागवून रंका समरांगणि जाऊ
आता अपुला, हा शेवटचा, उगारलेला वार नाही चुकणार
शेतकरी अन् दलित जनाला घेऊनिया पाठी
लोकशाही क्रांतीच्या, अपुल्या एक ब्रि्रदासाठी
कोटी करी ज्याने, ध्वजा लाल धरिली
मेघासम आता फळी धरून आपुली
पुढे चालला, रणी गर्जला, करुनी आपुला पोलादी निर्धार
एकजूट जनतेची साधुनी, जनराज्याची करून बांधणी
पूर्ण लोकशाहीला आणुनि, गाऊ मग यशगान
निनादून अस्मान, अंती वर्गविहीन-हिंद करू निर्माण
बंध तोडले, पाऊल पहिले, पुढे टाकले, मागे नच घेणार
- शा. अण्णाभाऊ साठे