आदिवासी दादा
adivasi dada adivasi dada AdivAsI dAdA | आदिवासी दादा
टेकडीच्या पायथ्याला छोटस गाव रं
जंगलचा राजा हाय तुझं नाव
शेतात गाळून कष्टाचा घाम, काळ्या मातीत पिकवतो सोनं
तुझं असूनी जंगलचं रान, तुलाच नाही खायाला दाणं
पोटात भूकेची रोज काव काव रं, जंगलचा...
नडीला देतो कर्ज सावकार, मुदला परास त्याचं व्याजच फार
भांडी-कुंडी इकली गहाण सारं, कर्जाच्या बोज्यानं झाला बेजार
वरून सावकाराचं तुलाच भ्याव रं, जंगलचा...
कुऱ्हाड घेऊनी जातो फाटयाला, भीत नाही कधी तू इंचू काटयाला
तुझ्या कष्टाच्या भल्या मोळीला, विकून का पैसं पुरती पोटाला
जशी सरडयाची कुपावर धाव रं, जंगलचा...
पिढयांपिढया गेल्या जंगलामधी, लाकूड तोडाया तुलाच बंदी
फॉरिष्टाची आता कशाला भिती, जंगलातली लाकडं तुझीच समदी
कर की रं तुकडं मारुनी घाव रं, जंगलचा...
पाण्यासाठी किती सोशितो कळं, नाही धरण, विहीर तळं
आला पाऊस तर भरतया खळं, नायतर वर्षाचा कोरडा दुष्काळ
जगाया नस्तो जरा बी वाव रं, जंगलचा...
आदिवासी दादा जागा हो आता, वेळ आली हातात घे ईला कोयता
नद्या नाल्या झुडपं डोंगर माथ्याला, हाक दे समद्या समिंदराला
समिंदराचा घे आता ठाव रं, जंगलचा...
- विलास घोगरे