करू पहिलं नमन ज्योतिबाला
karu pahilam namana jyotibala karu pahilam namana jyotibala karU pahilaM namana jyotibAlA | करू पहिलं नमन ज्योतिबाला
करू पहिलं नमन ज्योतिबाला, ज्यानं स्त्री मुक्तीला जन्म दिला
सन अठराशे सालात, स्त्रिया होत्या अज्ञानात
लिहा-वाचाया शाळा नव्हती, स्त्री घरात बंदिवान होती
अहो पण कारण काय?
कारण, कारण मनूनं सांगितलं होतं, स्त्रीला स्वातंत्र्य देऊ नका
बालविवाहाची बळी स्त्रीच होती, पुनर्विवाहाची तिला बंदी होती
स्त्री सती जात होती, चितेवर ढकलली जात होती
उठले राजा राममोहन रॉय, बघुनी स्त्रियांवरचा अन्याय
म्हणे ईश्र्वरचंद्र विद्यासागर, बंदी घाला बालविवाहावर
सन अठराशे सालात, स्त्रिया होत्या अज्ञानात
अशा अंधारात अशा अंधारात, ज्योतिबानं पहिला दिवा लावला, आणि स्त्री मुक्तीला...
अठराशे अठ्ठेचाळीस साल उजाडलं,
आणि त्यानं बंडाचं निशाण रोवलं,
सावित्रीला त्यानंच शिकवलं
ज्ञानाचे दार उघडले, रुढींचे पाईक खवळले
झेलून दगडविटा, सोसून शेणमारा, मुलींसाठी काढली पहिली शाळा, आणि स्त्री मुक्तीला...
सनातन्यांनी केला हल्ला, परी जरा नाही डगमगला
अहो आपल्या घरातला हौद त्यानं दलितांसाठी खुला केला
स्त्रिया, दलित आणि बहुजनांसाठी आपला सारा जन्म त्यानं वेचला, आणि स्त्री मुक्तीला...
फुले, आगरकर आणि कर्वे, समाजसुधारणेसाठी झिजले
पंडिता रमाबार्इंच्या रूपानं आम्हा आशेचे किरण दिसले
आणि मग? पुढं काय झालं? पुढ़ं?
स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली, गांधी नेहरूंनी हाक तिला दिली
स्त्री घराघरांतून बाहेर आली आणि
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढा देऊ लागली
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तर दलित स्त्रीची अस्मिता जागी केली
आणि आज, आज या सगळ्यांना स्मरून
घेऊ आज आण एकीची, स्त्री मुक्तीसाठी लढण्याची
घेऊ आज आण एकीची, दलित मुक्तीसाठी लढण्याची
घेऊन एकीचे हत्यार होऊ काळावर स्वार
फोडून टाकू रूढींचा किल्ला, करू पहिलं नमन ज्योतिबाला...
- ज्योति म्हापसेकर