या देशाच्या बायांना
ya deshachya bayamna ya deshachya bayamna yA deshAchyA bAyAMnA | या देशाच्या बायांना
या देशाच्या बायांना, आया-बहिणींना सांगाया जायाचं हाय गं
एकी करून आणि लढा पुकारून ह्यो तुरुंग फोडायचा हाय गं
या तुरुंगाच्या भिंती-भिंतीमधून हाय लेकीसुनांना चिणल्यालं
अन् पिळणाऱ्या कायद्याचं धागं घेऊन जाळं गुलामगिरीचं विणल्यालं
या जाळ्यात अडकून, दबल्या मनानं आता मरत राह्याचं न्हाय गं, एकी...
या तुरुंगाच्या चिऱ्याचिऱ्यावरी, हायती धर्माची गाणी लिवल्याली
मानसं मानसं फोडून, एकली एकली झोडून, हाय कष्टाची कमाई गिळल्याली
हात घशात घालून, त्यांना पालथं पाडून, गेलं समदं ते मिळवायचं हाय गं, एकी..
या तुरुंगाच्या इटेइटेसाठी आपल्या रानातली माती हाय घेतल्याली
गावात दारू आणून चिलीम-गांजा पाजून, आपल्या पुरुषांची ताकद हाय मारल्याली
आता म्होरं होऊन, दारू-गुत्तं फोडून, समदं जमीन मागाया जायाचं, एकी...
या तुरुंगाची राखण करण्यासाठी, पाद्री, मुल्ला न् पुजारी बसल्यालं
किल्ल्या हाती घेऊन, दंडा खांद्या लावून, हायेत भांडवलदार, साखरदार बसल्यालं
देवदासी चला, आदिवासी चला, बौध्द दलित पुढयात राह्याचं, एकी...
- माधव चव्हाण