या वस्तीच्या पलीकडे

ya vastichya palikade ya vastichya palikade yA vastIchyA palIkaDe | या वस्तीच्या पलीकडे

या वस्तीच्या पलीकडे, जरा दूर
काळ्या नाल्यापलीकडे
कचऱ्या भुताच्या रानापाठच्या
शिंग्या डोंगराच्या पलीकडे, जरा दूर
असेल माझे गाव
वसले असेल माझे गाव
या वस्तीला विळखा धुरकटसा
झाडांचा चेहरा धुळकटसा
चिखलाचा राडा किचकटसा,
हो, खेळ माझा मांडला मी रस्त्यावरी
हात चिखलात शोधती काहीतरी
असले नसेल गाव माझे, असले नसेल गाव माझे
इथे यंत्रचाकांची वाढे गती
तशा उंच वाढती इमारती
मग खचतो पाया दहा विती
रोज सागराचा भंगी घाण काढतो
या शहराच्या उजव्या अंगाला
असले नसेल गाव माझे, असले नसेल गाव माझे
इथे माणसाच्या पाठीला आलंय पोक
पण आगीनगाडयांचा दरारा चोख
वर मोटारगाडयांचा दिमाख झोक
इथे जिवात जीव नाही, अंगात रग नाही
अशांच्या गर्दीचा हा मसणवटा
असले नसेल गाव माझे, असले नसेल गाव माझे
इथे वाहतोहे पैसा पाण्यात
अन् पाण्याला भाव जसा दुष्काळात
इथे हवेला भाव चढा दुकानात
श्वास राहतो खाली, आणि वर वरचा
आणि बेरंग जाहतो जीवनाचा
असले नसेल गाव माझे, असले नसेल गाव माझे
माझे स्वप्नातले हो गाव हिरवे
त्याचा हिरवासा श्वास अन् रूप नवे
उन सोनेरी तिथले हवे हवे
तिथे नभनिळी दुलई पांघरायला
आणि माणसाचा रंग हो माणसाला
असले असेल गाव माझे, असले असेल गाव माझे

Read more

एआयचा बाजार

एआयचा बाजार

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle