गर्जा जयजयकार क्रांतिचा
garja jayajayakara kramticha garja jayajayakara kramticha garjA jayajayakAra krAMtichA | गर्जा जयजयकार क्रांतिचा
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
अन वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार
खळखळू द्या या अदय साखळ्या हातापायात
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात
सर्पांनो उद्दाम आवळा कसूनिया पाश
पिचेल मनगट परी उरातिल अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार
कधीही तारांचा संभार, गर्जा...
कु्र$ध्द भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान
कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान
मरणाच्या छायेत वाहिले मातृभूस प्राण
मरणाहुनि बलशाली आहे अमुचा अभिमान
मृत्युंजय आम्ही अम्हाला कसले कारागार
अहो हे कसले कारागार, गर्जा...
पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती
होऊनिया बेहोष धावलो धेय्यपथावरती
कधी न थांबलो विश्रांतीस्तव पाहिले न मागे
बांधु न शकले कीर्तीचे वा प्रीतीचे धागे
एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार
होता पायतळी अंगार, गर्जा...
श्र्वासांनो जा वायूसंगे ओलांड़ुनि भिंत
अन आईला कळवा अमुच्या हृदयातिल खंत
सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात
बध्द करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तिचे एकच होते वेड परी अनिवार
तयांना वेड परी अनिवार, गर्जा...
नाचविता ध्वज तुझा गुंतले श्रृंखलेत हात
तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तात
चरणांचे तव पूजन केले म्हणूनि गुन्हेगार
देता जीवन-अघ्र्य तुला ठरलो वेडेपीर
देशील ना पण तुझ्या कुशीचा वेडयांना आधार
आई, वेडयांना आधार, गर्जा...
कशास आई भिजीविसि डोळे, उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे ऊष:काल
सरणावरती आज आमुची पेटतात प्रेते
उठतिल त्या ज्वालांतुनि भावी क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायामधले खळाखळा तुटणार
आई, खळाखळा तुटणारग्न, गर्जा...
आता कर ओंकारा तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळीच्या गळ्यावरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरिराचा कर सुखेनैव या सुखेनैव संहार
मरणा सुखेनैव संहार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
- कुसुमाग्रज