नवा शिपाई
nava shipai nava shipai navA shipAI | नवा शिपाई
नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे
कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे
ब्राह्मण नाही, हिन्दुही नाही, न मी एक पंथाचा
तेच पतित की जे आखंडिती प्रदेश साकल्याचा
खादाड असे माझी भूख
चतकोराने मला न सूख
कूपातिल मी नच मंडूक
मळ्यास माझ्या कुंपण पडणे, अगदी मला न साहे
कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे
जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत
सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत
कोठेही जा-पायाखाली तृणावृता, भू दिसते
कोठेही जा-डोईवरती दिसते नीलांबर ते
सावलीत गोजिरी मुले
उन्हात दिसती गोड फुले
बघता मन हर्षून ड़ुले
ती माझी, मी त्यांचा-एकच ओघ आम्हातुनि वाहे
कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे
नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे
- केशवसुत